मुंबई : भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक घरगुती स्वरुपाची असली तरी त्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंज या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांची घरगुती विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला भाजपकडून कोणाला बोलवायचं, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

प्रसिद्ध बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मितालीसोबत अमित विवाहबंधनात अडकणार आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

आशिष शेलार आणि राज ठाकरे तब्बल दोन तास गप्पा मारत होते. व्यक्तिगत गप्पांसोबत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही गुफ्तगू झाल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये अनेकदा बैठका झाल्या आहेत.