मुंबई : मुंबईतल्या फेरीवाल्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या दारात पोहोचले आहेत.


मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना भेटून त्यांनी फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं. सुरुवातीला रेल्वे पुलांवरील फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी आता सर्वच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी आयुक्तांना सुचवल्या आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या निवेदनानंतर महापालिका फेरीवाल्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना येत्या 15 दिवसात हटवा. जर रेल्वेने ही कारवाई केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसं म्हणजे मनसैनिक त्यांना हटवतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला काढलेल्या संताप मोर्चात रेल्वे प्रशासनाला दिला होता.

15 दिवसांचा अल्टिमेटम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज यांनी यावेळी दिला होता.

बुलेट ट्रेनला विरोध कायम

यावेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप राज यांनी केला. तसंच बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं राज म्हणाले होते.

मूठभर लोकांचं कर्ज देशाने का भरायचं?

बुलेट ट्रेनचा लाभ काही लोकांनाच होणार आहे. तो होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. मोदींचा जुना व्हिडीओही त्याबाबत सांगून गेला. मग मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा 16 व्या दिवशी आम्ही हटवू : राज ठाकरे

परवानगीविना मनसेचा मोर्चा, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल