MLC Election 2022 :  विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता दोन दिवसच बाकी असल्याने अपक्ष आणि छोटे पक्ष गळाला लागण्यासाठी आता भाजपाने कंबर कसली आहे. कालच विधानपरिषदेचे उमेदवार प्रसाद लाड हे हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला आले होते. आणि आज पुन्हा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि उमेदवार प्रवीण दरेकर आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन त्याच्या सोबत मंगेश चव्हाण देखील होते. सुमारे तीन तास ठाकूरांच्या कार्यालयात चर्चा झाली.  


भाजपा आणि काँग्रेसला आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अपक्ष आणि छोटे पक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. काल ठाकूरांच्या भेटीसाठी विधानपरिषदेचे उमेदवार प्रसाद लाड स्वतः आले होते. माञ काल लाड यांनी ठाकूरांची भेट घेतल्यावर भाजपाचा दुसरा उमेदवार आला नसल्याची खंत ठाकूरांनी लाडांकडे व्यक्त केली होती. त्यामुळेच गाडीवरुन उतरल्यावर दरेकरांनी आप्पा मी एकलंय की तुम्ही मला शिव्या दिल्यात.., म्हणून मला यावं लागलं. लाडने सांगितलं की दरेकर एवढा मोठा झालायं की, माझ्याकडे येवू शकत नाही.  आणि हे वाक्य लाड यांनी दरेकरांना सांगितल्यावर दरेकर थेट लोकल ट्रेन पकडून गिरीश महाजन मंगेश चव्हाण सोबत ठाकूरांची भेट घेण्यासाठी धडकले.


हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मतं आहेत. या तिन्ही मतांवर महाविकास आघाडी आणि भाजपचा डोळा आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंकडून हितेंद्र ठाकूर यांना गळ घातली जात आहे. आधी काँग्रेसकडून भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजप नेतेही हितेंद्र ठाकूर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विरारवारी केली. 


राज्यसभा निवडणुकीतही ठाकूर यांची मनधरणी 
या आधी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर यांच्या घरी सर्व पक्षीय नेत्यांनी येरझाऱ्या मारल्या. त्यावेळी जिंकून येणाऱ्या उमेदवाराला आपण मतदान केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं होतं. 


हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीय संबंध 
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत. ते जितके पवारांच्या जवळचे आहेत तितकेच उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजपच्याही जवळचे आहेत. त्यामुळे त्यांचं मत कुणाकडे जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.