मुंबई : टीम इंडियाच्या ऑरेंज जर्सीला सपा नेते अबू आझमी यांनी विरोध केला आहे. ऑरेंज जर्सीमुळे भगवीकरण होत असल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला आहे. शिवाय जर्सीमध्ये भगवा रंग देऊ शकता, मग हिरवा का नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे.


भारतीय संघांच्या जर्सीला तिरंग्यातील रंग दिले असते काही हरकत नव्हती. मात्र प्रत्येक गोष्टीत भगवीकरण होत आहे, ते योग्य नाही. देशातील जनतेने याचा विरोध करायला हवा, असं अबू आझमी यांनी म्हटलं.


यंदाच्या विश्वचषकात आयसीसीनं पहिल्यांदाच फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे जर्सीचा प्रयोग केला आहे. त्यामुळे टीम इंडिया येत्या रविवारी यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीमध्ये खेळणार आहे. ही जर्सी निळ्या आणि भगव्या रंगाची असणार आहे. पण या जर्सीतल्या भगव्या रंगाला अबू आझमी यांनी विरोध केला आहे.



भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची जर्सी निळ्या रंगाची आहे. त्यामुळे यजमान या नात्यानं इंग्लंडला निळ्या जर्सीतच खेळण्याची संधी मिळेल. पण टीम इंडियाला पर्यायी जर्सीत खेळावं लागणार आहे.


मात्र भारतीय संघाची जर्सी आणि धर्माचा काहीही संबंध नाही. मुळात भारतीय संघाच्या जर्सी निळ्या आणि भगव्या रंगाची असेल, अशी नोंद आयसीसीकडे करण्यात आलेली आहे. भारतीय संघाची ही नवी जर्सी संपूर्ण भगवी नसेल, केवळ फक्त हात आणि कॉलरच्या आतला भाग भगव्या रंगाचा असणार आहे.