मुंबई : महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाची तशी खास खाद्य संस्कृती आहे. या प्रत्येक पदार्थाची वेगळी लज्जत असली तरीही या सगळ्यात प्रत्येकाच्या जीभेवर रेंगाळणारी चव आहे मिसळीची... मुंबईकरांनाही अशाच वेगवेगळ्या मिसळीची चव एकाच ठिकाणी चाखता येणार आहे.

मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक दर्जेदार पदार्थ आहे. मूग , मटकीची उसळ , पोह्यांचा चिवडा, वरुन सजवलेलं शेवेचं आवरण आणि थोडंसं शिंपडलेलं लिंबू... कुठल्याही हॉटेलात ही अशी सजवलेली मिसळ पाहिली की जिभेला नक्कीच पाणी सुटतं... त्यामुळे खास मुंबईकरांना मिसळीची तृष्णा भागवण्यासाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

मुंबईतील पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने 9 आणि 10 डिसेंबर या वीकेंडच्या दिवशी सावरकर पटांगणाच्या प्रांगणात हा लज्जतदार मिसळ महोत्सव आयोजित केला आहे. शनिवारी चार वाजता हा महोत्सव सुरु झाला. रविवारीही मुंबईकरांना या महोत्सवाला जाता येईल. या महोत्सवात खवय्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मिसळीची चव चाखता येणार आहे.



यामध्ये पुण्याची नादखुळा मिसळ, नाशिकची माऊली मिसळ, संगमेश्वरची मुळ्ये मिसळ, विलेपार्ल्याची मामलेदार मिसळ , कोल्हापूरची लक्ष्मी मिसळ , पेणची आप्पा मिसळ आणि लोणावळ्याच्या मनशक्ती मिसळ अशा कित्येक प्रकारच्या मिसळ आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वाट पाहत आहेत.

सुट्टीच्या दिवशी मिसळ महोत्सवाचं आयोजन केल्यामुळे या महोत्सवाला लोकांचा सुसाट प्रतिसाद मिळत आहे. तर या चविष्ट मिसळ महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी लोक रांगा लावून कुपन्स खरेदी करत आहेत.

सोबतच मिसळचा नेमका शोध कसा लागला, मिसळ सोबत पाव खाण्याचं कॉम्बिनेशन कोणी शोधलं , कुठल्या भागाची कुठली मिसळ प्रसिद्ध आहे अशा अनेक गोष्टींची माहिती आपण तिथल्या स्पीकर वरून ऐकू शकतो. त्यामुळे वीकेंडच्या सुट्टीत काहीतरी चमचमीत, मसालेदार आणि आठवणीत राहणारं खायचं असेल तर या मिसळ महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहायला हवं.