ठाणे : मिसळ हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक दर्जेदार पदार्थ आहे. मूग , मटकीची उसळ , पोह्यांचा चिवडा, वरुन सजवलेलं शेवेचं आवरण आणि थोडंसं शिंपडलेलं लिंबू... कुठल्याही हॉटेलात ही अशी सजवलेली मिसळ पाहिली की जिभेला नक्कीच पाणी सुटतं... त्यामुळे ठाणेकरांची मिसळीची तृष्णा भागवण्यासाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.




पुण्याच्या मिसळ महोत्सवाला घवघवीत यश मिळाल्यानंतर नंदकिशोर अडनाल यांनी ठाण्यातही मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे.

ठाण्यातील घंटाळी मैदानात 19 ते 21 जानेवारीपर्यंत 'मिसळ महोत्सव' भरला आहे. ज्यामध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर येथील प्रसिद्ध अशा मिसळीचे स्टॉल लागलेले आहेत. जैन मिसळ, काळ्या-तांबड्या रस्स्याची, खोबऱ्याची, चुलीवरची चमचमीत आणि घमघमीत मिसळ खायला मिळणार आहे.



20 वेगवेगळ्या मिसळीचे स्टॉल... 70 प्रकारच्या मिसळीचीं चव...कुठे पुणेरी, कुठे चुलीवरची, तर कुठे कोल्हापूरचा झटका अशा चमचमीत मिसळीचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे.

मिसळीची चव घेतल्यानंतर जिभेला शांत करण्यासाठी बर्फाचा गोळा, मोदक, पुरणपोळी अशा थंड आणि गोड पदार्थांची सोयही या मिसळ महोत्सवात करण्यात आली आहे.