Mira Bhayandar Mayor Election: मीरा-भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Mayor) निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाने नवीन आणि वादग्रस्त वळण घेतले असून, “मराठी महापौर” या मुद्द्यावर आता संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी (Mira Bhayandar Mayor) नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने, मीरा-भाईंदर महापालिकेला एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर (Mayor) मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात होती. या घडामोडीमुळे मराठी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह (MNS) मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर आता मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौरच बसावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून आज पुन्हा एकदा मीरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आज भाजपचा महापौर हा पदभार स्वीकारणार आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी आज पदभार स्वीकारतील.(Mira Bhayandar Mayor)
Mira Bhayandar Mayor Election: या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही
मात्र मागील काही दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशी मागणी मराठी एकीकरण समिती मनसे आणि इतर राजकीय पक्ष आणि संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आज मोठा वाद मीरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर होण्याची शक्यता आहे. सुभाष चंद्र बोस मैदान ते मीरा भाईंदर महापालिका असा मोर्चा मराठी एकीकरण समितीकडून सकाळी दहा वाजता काढला जाणार आहे. या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून परवानगीचे पत्र ही पोलिसांना दिलेलं नाही, त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय मराठी एकीकडे समितीचे आंदोलन सुभाष चंद्र बोस मैदानातच करण्यात यावं असं सुद्धा नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. (Mira Bhayandar Mayor)
Mira Bhayandar Mayor Election: ..तर आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख याबाबत म्हणाले, रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची एकच मागणी आहे की, इथे मीरा-भाईंदर महापालिकेत मराठी महापौर करा. एक महिन्यापासून आमची हीच मागणी आहे. डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत आमचा पहिल्या वेळेस सुद्धा त्यांना विरोध होता. नरेंद्र मेहता आमदार आहेत, दुसरे मोरारजी देसाई इथे तयार होत आहेत आणि घराणेशाही इथे सुद्धा पाहायला मिळते, म्हणूनच डिंपल मेहतांना दुसऱ्यांदा महापौर केलं जात आहे. आम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्या मात्र आम्ही सुद्धा पोलिसांना सांगतो की, आम्ही मीरा-भाईंदर महापालिकेपर्यंत मोर्चा घेऊन जाणार आहोत. जर एवढा विरोध करून सुद्धा मराठी महापौर बसवला जाणार नसेल आणि डिंपल मेहताच महापौर बसतील तर आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल. आगरी कोळ्यांचे मीरा-भाईंदर शहर आहे, मराठी माणसांचे शहर आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं होतं की महापौर मराठीच बसणार असंही ते पुढे म्हणालेत.
Mira Bhayandar Mayor Election: मराठी समाजात तीव्र असंतोष
भाजपाच्या या निर्णयामुळे मराठी समाजात असंतोषाची तीव्र लाट उसळली आहे. “मराठी माणसाचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो का?” असा थेट सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा डावलल्याचा आरोप करत, समितीने भाजपाच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देखील भाजपच्या भूमिकेचा विरोध केला जात आहे.
