मुंबईत भरधाव कारने एकाच कुटुंबातील चौघांना उडवलं, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2016 02:12 AM (IST)
मुंबई : मुंबईतल्या ओशिवारा भागात रात्री कारच्या धडकेत पाच वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला. अपघात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव संदीप कोळेकर असं आहे. संदीप आपल्या आजी, आजोबा आणि आईसह आनंदनगरच्या रस्त्यावरुन घरी परतत होता. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्ता क्रॉस ओलांडत असताना एका चारचाकी कारनं या कुटुंबाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात पाच वर्षांचा संदीप दूर फेकला गेला. या अपघातात संदीपचे आजोबा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, संदीपला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या अपघाताप्रकरणी कारचालक इंद्रजित मरोल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारच्या अतिवेगानं हा अपघात झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.