मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा दुसरा प्रताप आता समोर आला आहे. बिल्डर प्रेमाचा हा त्यांचा दुसरा पुरावाच आहे. म्हाडाचा भूखंड मेहतांनी थेट खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचं दिसतं आहे.

घाटकोपरमधील पंतनगर परिसरात 1997 पासून संक्रमण शिबिरात 496 लोक राहतात. या लोकांना कायमची घरं मिळावीत, म्हणून 1999 साली सरकारनं 18 हजार 902 चौरस मीटरचा भूखंड खासगी विकासकाला दिला. पण 2006पर्यंत भूखंडावर एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे हा भूखंड म्हाडानं परत घेतला.

नव्या नियमानुसार या भूखंडाचा विकास फक्त सरकारी यंत्रणा म्हणजे म्हाडाच करु शकतं. मात्र, त्यानंतरही प्रकाश मेहता यांच्या कृपेनं हा भूखंड खासगी विकासकाला देण्यात आला. मात्र त्यानंतरही या भूखंडावर एकही घर उभं राहिलं नाही.

ज्या विकासकाला 20 वर्षात एकही घर बांधता आलं नाही, त्या विकासकाला पुन्हा नेमण्यात काय अर्थ? हा प्रश्न आहे. जर म्हाडानं भूखंडाचा विकास करायचा आहे तर मेहतासाहेब निर्मल बिल्डर्ससाठी इतके आग्रही का आहेत?

झोपु योजनेचा एफएसआय बिल्डरच्या खिशात घालणं असो, की म्हाडाचा भूखंड खासगी विकासकाला देणं. प्रकाश मेहता नियम, कायदे पायदळी तुडवण्यात वाकबगार आहेत. कदाचित आपलं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, असा त्यांचा ठाम समज झाला आहे. आता मुख्यमंत्री मेहतांची भर सभागृहात पाठराखण करत आहेत आणि रोज त्यांच्या नव्या प्रतापांचे मनोरे उभे राहत आहेत.

संबंधित बातम्या :

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश