मुंबई: नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करण्याचं वृत्त एबीपी माझानं प्रसारित केल्यानंतर आता याप्रकरणी चौकशी करुन संबंधित महिलेवर कडक कारवाई करण्याचे आदेश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पाळणाघरात चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाविषयी बोलताना मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला. 'हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे. हे पाळणाघर खासगी होतं की त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी घेतली होती. याची चौकशी करण्यात येईल. तसेच इथं नियमांचं उल्लंघन झालं का याबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर कडक कारवाई केली जाईल. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशीही बोलून मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे.' अशी प्रतिक्रिया याप्रकरणी पंकजा मुंडेंनी दिली आहे.

खारघर सेक्टर १० मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात आहेत. आज दुपारी पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे.

जखमी चिमुकलीला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलिसात आया अफसाना शेख आणि पाळणा घराची मालकीण प्रियंका निकमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण झालेल्या चिमुकलीच्या पालकांशी जेव्हा एबीपी माझानं संपर्क साधला त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली.

'माझ्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या महिलेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा'

'आम्ही मुलीला पाळणाघरात ठेवण्याचा पहिलाच दिवस होता. आम्ही दोघंही कामानिमित्त बाहेर जातो. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मुलीला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. पहिल्याच दिवशी मुलीला घरी आणल्यानंतर ती खूप गप्प होती. तिच्या डोक्याला थोडीशी जखम झाल्याचं आम्हाला जाणवलं. त्यानंतर आम्ही मुलीला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुमच्या मुलीला कुणीतरी मारहाण केली आहे. डॉक्टरांंनी तात्काळ तिचं सिटीस्कॅन केलं. तेव्हा तिच्या मेंदूला थोडी दुखापत झाल्याचं समोर आलं. पण वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. सध्या मुलीच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.'

'या सर्व प्रकारानं आम्ही आधीच हादरुन गेलो होतो. त्यानंतर सर्व गोष्टींचा अंदाज बांधून आम्ही पाळणाघराचं सीसीटीव्ही तपासलं. त्यावेळी धक्कादायक चित्र आम्हाला पाहायला मिळालं. सीसीटीव्हीमध्ये आम्हाला स्पष्ट दिसलं की, माझ्या मुलीला पाळणाघरातील महिला बेदम मारहाण करीत होती. त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसात धाव घेतली. पण पोलिसांनी हे प्रकरण तेवढ्या गांभीर्यानं घेतलं नाही. तसंच या पाळणाघराच्या मालकिणीच्या नवऱ्यानं मला पोलिसात गेल्यानं धमकी दिली.'

'या सर्व प्रकरणावर माझी मागणी आहे की, माझ्या चिमुकलीला मारहाण करणाऱ्या या महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसंच जेव्हा माझ्या मुलीला मारहाण होत असताना इतर मुलं इतके गाढ कसे काय झोपले होते? त्या मुलांसोबत देखील असंच काही झालं होतं का?' अशी माहिती या चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझा दिली आहे.

VIDEO:



संबंधित बातम्या:

VIDEO: दहा महिन्याच्या चिमुकलीला पाळणाघरात अमानुष मारहाण