Milind Narvekar : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अवजड वाहनांसदर्भात मोठी मागणी
Milind Narvekar : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गांवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक स्तरावर किमान सहा महिने फक्त प्रवासी वाहने या मार्गावर सोडण्यात यावीत. अवजड वाहने सुरुवातीची सहा महिने मिसिंग लिंकवरुन सोडू नयेत अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प या राज्याच्या महत्वाकांक्षी व जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे काम त्वरेने प्रगतीत आहे. सदरहू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होऊन अपघातात घट होणार आहे. त्यामुळे बोर घाटातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. सदरहू प्रकल्प माहे एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे समजते याबाबत सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, असं मिलिंद नार्वेकर म्हणाले.
मिलिंद नार्वेकर सार्वजनिक उपक्रम समिती सदस्य देखील आहेत. या समितीचे सदस्य म्हणून नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलीय ते म्हणतात, सदर प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने आणि बोर घाटातील खोल दरीत मोठया प्रमाणात हवेचा दाब असून आणि पावसाच्या व धुक्याचे गडद क्षेत्र असल्याने सदर प्रकल्पातील सर्व तांत्रिक चाचण्या व अनुषंगिक कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरु करण्याची घाई कृपया करण्यात येऊ नये. तशा सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितास देण्यात यावी.
सद्यस्थितीत मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक मोठया प्रमाणावर वाढलेली असून मोठ्या प्रमाणात दळणवळण होणाऱ्या अवजड वाहनांमुळे घाटात मोठया प्रमाणावर कोंडी होत असते. या अनुषंगाने सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने फक्त प्रवासी वाहने या मार्गाने सोडण्यात यावीत व अवजड वाहने सोडण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारची इंधने अथवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहने या मार्गावर कधीही सोडण्यात येऊ नये म्हणून भविष्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही, असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान , आमदार मिलिंद नार्वेकर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या आमदारांनी काही महिन्यांपूर्वी मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केली होती.
























