Mhada Lottery News: मुंबईतील मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांना शहरातील मोक्याच्या ठिकाणी हक्काचे घर विकत घेण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जाते. मुंबईत अनेकजण घरांसाठी म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. म्हाडाकडून (Mhada) उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या घरांची किंमत बाजारभावापेक्षा 20 ते 30 लाखांनी कमी असते. त्यामुळे ही स्वस्तातील घरं विकत घेण्यासाठी अनेकांच्या उड्या पडतात. शेकड्याच्या किंवा हजाराच्या पटीत उपलब्ध असणाऱ्या घरांसाठी लाखोंनी अर्ज येत असतात. आता म्हाडाने अशीच एक सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मुंबईत स्वस्तात दुकानं, व्यावसायिक गाळे विकत घेता येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 149 दुकांनाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.

या दुकानांच्या ई-लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज करता येणार असून 29 ऑगस्ट रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर होईल. संगणकीय पद्धतीने बोली लावण्यास 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 पासून सुरुवात होईल. या ई लिलावात मुंबईतील 17 ठिकाणी असणार्‍या 149 दुकांनांचा समावेश आहे. यामध्ये मागील लिलावात विकल्या न गेलेल्या 124 दुकानांचा समावेश आहे. मुंबई मंडळाने या दुकानांसाठी 23 लाख रुपयांपासून थेट 12 कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित केली आहे. म्हाडाकडून यासाठी अनामत रक्कम किती भरावी लागेल, याची माहितीही देण्यात आली आहे. 50 लाखांपर्यंतच्या दुकानांसाठी बोली लावण्यासाठी डिपॉझिट 1 लाख रुपये, 50 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या दुकानांसाठी 2 लाख रुपये, 75 लाख ते 1 कोटीपर्यंतच्या दुकानांसाठी 3 लाख रुपये आणि 1 कोटीपेक्षा जास्त किंमतीच्या दुकानांसाठी बोली लावण्यासाठी 4 लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या बोलीपेक्षा अधिक बोली लावणारा अर्जदार विजेता ठरणार आहे. या ई-लिलावातून म्हाडाला 229 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Mhada House Lottery: म्हाडाकडून 5,285 घरांची लॉटरी, अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवली

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरांच्या सोडतीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील साधारण 77 भूखंडांच्या विक्रीसाठी मुदतवाढ जाहीर केलेली आहे. यामुळे इच्छूक उमेदवार आता 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील, त्यांना 29 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कम भरणे शक्य राहील. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या घरांच्या सोडतीमध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा आणि नवी मुंबई अशा विविध भागांतील घरांचा समावेश आहे. या घरांच्या किमती 9.50 लाख ते  85 लाखांपर्यंत आहेत. आता 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे.

आणखी वाचा

Mhada Lottery 2025 : म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना अनामत रक्कम किती भरावी लागेल?