MHADA: म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी घरांच्या किमती निश्चित करताना घातलेल्या घोळाचा फटका आता अर्जदारांना बसणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑक्टबर २०२४ मध्ये  उपलब्ध होणाऱ्या ३७० घरांच्या किमतीत१० ते २५ टक्क्यांनी कपात करण्याचा  निर्णय घेतला होता. पण त्याचवेळी १४ घरांसाठी चुकीच्या रेडीरेकनर किमती निश्चित झाल्याने या घरांच्या किमती कमी होण्याऐवजी १२ ते १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता सप्टेंबर महिना अर्धा संपला असून अर्ज विक्री प्रक्रीयेस अवघे १५ दिवस शिल्लक असताना किमतीत बदल करण्याची नामुष्की म्हाडाच्या मुंबई मंडळावर आली आहे. या घरांच्या सुधारित किमती मंडळाने जाहीर केल्या आहेत.


म्हाडा वसाहतीच्या अंतर्गत २०२४ च्या सोडतीसाठी ३७० घरे उपलब्ध आहेत. उपलब्ध घरांच्या किंमती या रेडीरेकनर दराच्या ११० टक्के दराने निश्चित करण्यात येतात.  म्हाडाच्या मुंबई मंडळाने  ३७० घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांची कपात करून अर्जदारांना दिलासा दिला होता. मात्र, त्याचवेळी यातील १४ घरांच्या किमती कमी होण्याऐवजी १२ ते १३ लाखांनी वाढल्या आहेत.


घरांच्या क्षेत्रफळ, उत्पन्न गट आणि किमतीत तफावत


म्हाडाच्या घरांच्या किमती त्या परिसरातील रेडीरेकनरच्या दराच्या ११० टक्के दराने निश्चित केल्या जातात. मात्र, या घरांचे क्षेत्रफळ, उत्पन्न गट आणि घरांच्या किमती यात कमालीची तफावत असल्याने आता ही घरे महाग झाली आहेत.यावरून म्हाडावर मोठी टीका होत होती. ही टीका लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने उत्पन्न गटानुसार घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांची कपात केली. त्यानुसार, ३७० घरांच्या किमतीत कपात झाली खरी मात्र ३७० घरांच्या किंमतीत वाढ झाली असून नवीन किंमती म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 


घरासाठी अर्ज भरलेल्यांचा अपेक्षाभंग


म्हाडा प्राधिकरणाच्या २८ ऑगस्टच्या निर्णयानुसार या घरांच्या किमतीत २० टक्क्यांनी कपात होईल, अशी आशा या घरांसाठी अर्ज भरलेल्यांना तसेच अर्ज भरू इच्छिणाऱ्यांना होती. किमती कमी होण्याऐवजी २ सप्टेंबरला या किमती तब्बल १२ ते १३ लाख रुपयांनी वाढल्या. त्यामुळे ४३ लाख ९७ हजार ९५९ रुपये असलेली घराची किंमत ५६ लाख ७९ हजार ३१३ रुपये झाली आहे.


रेडीरेकनरचे दर चुकीचे आकारल्याने गोंधळ


मुंबई मंडळानुसार, या घरांच्या किमती २०२४-२५ च्या रेडीरेकनरनुसार निश्चित करण्यात आल्या. मात्र, रेडीरेकनरचे चुकीचे दर आकारण्यात आले. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नोंदीमुळे मोठा गोंधळ उडाला असून आता या घरांची किंमत पुन्हा जाहीर केल्या गेल्या आहेत.