मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून माहुलवासियाचं आंदोलन मुंबईत सुरु आहे. या माहुलवासियांना म्हाडाकडून तात्पुरती 300 घरं दिली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. माहुलवासियांनी 1200 घरांची तातडीनं मागणी केली होती. यावर सामंत यांनी 300 घरं देण्याबाबत माहिती दिली. तसेच या प्रकरणी महानगरपालिका, मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे आणि माहुलवासियांचा प्रश्न सोडवावा, असेही ते म्हणाले.

... तर राजकारणातून निवृत्ती घेईन 

जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. म्हाडाच्या लॉटरीत शिवसैनिकांच घरं कशी लागली अशी टीका माजी खासदार निलेश राणेंनी केली होती. आता त्यालाच म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय म्हाडाच्या लॉटरीत भष्ट्राचार समोर आला तर राजकारणातून निवृत्ती घेईन, जर भष्ट्राचार समोर आला नाही तर निलेश राणेंनी निवृत्ती घ्यावी, असं थेट चॅलेंज माजी खासदार निलेश राणेंना दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी निलेश राणेंनी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. म्हाडाच्या लाॅटरीत शिवसैनिकांच घरं कशी लागली? अशी टीका केली होती.  नुकत्याच झालेल्या लाॅटरीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं निलेश राणेंनी म्हंटलं होतं. तसेच यासंबधी आपण कोर्टात महत्वाचे पुरावे सादर करणार असल्याचा इशारा त्यांना दिला आहे.

तानसा जलवाहिनी प्रकल्पग्रस्तांचं चेंबुर जवळील माहुल गांवात पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी कारखाने, रिफायनरीमुळे फैलावलेलं भीषण प्रदुषण, रोगराईंमुळे कायमस्वरुपी दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन देण्यात यावं यासाठी माहुल मधील रहिवाशांचा जीवन बचाओ आंदोलन  सुरु आहे.  आंदोलनाला 50 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी याची दखलही घेतली नाही असं आंदोलनर्त्यांचं म्हणणं आहे.