मुंबई : जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांप्रति जास्तीत जास्त संवेदनशील राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीला प्रथम वैद्यकीय अहवाल म्हणजेच मेडिकल रिपोर्ट न मागता त्यांना आधी लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याची सोय करुन त्यांच्यासोबत एक अमलदार सुद्धा पाठवावा. जे कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.


आपल्या आदेशात पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे की, पोलिस स्टेशनला जर कोणी जखमी व्यक्ती तक्रार देण्यासासाठी येते तर त्यांची तक्रार घेण्याऐवजी आणि त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडे आधी वैद्यकीय अहवाल मागितला जातो आणि तो सुद्धा त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन करुन घेण्यास त्यांना सांगितलं जातं, असं वरिष्ठांच्या निदर्शनास आलं आहे.


आयुक्तांना हा दृष्टीकोन असंवेदनशील वाटला. या कृतीमुळे तक्रारदाराच्या मनावर पोलिसांबद्दल वाईट प्रभाव पडू शकतो. कधीकधी हे नागरिक तक्रार नोंदवण्यासही येत नाहीत आणि ही बाब नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयासाठी योग्य नाही, असं मत आयुक्तांनी व्यक्त केलं.




पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "यापुढे पोलीस जखमी व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी मेमो देतील, पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करतील आणि त्यानंतर जखमी व्यक्तीसह पोलीस हवालदार उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवावं आणि नंतर कायदेशीर प्रक्रियेस पुढे जावं."


आयुक्तांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास तर वाढेलच पण त्यासोबतच पोलीस आणि नागरिकांमध्ये एक जवळीकही निर्माण होईल, असा विश्वास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.


काही वेळेला अशाही घटना समोर आल्या आहेत की आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे काही लोकांना रुग्णालयात पोहोचणे शक्य होत नाही, कारण त्यांच्याकडे ॲम्बुलन्स करण्यासाठीही पैसे नसतात. यामुळे सुद्धा लोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास टाळतात. मात्र मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे असे लोकही आता पुढे येऊन तक्रार नोंदवतील.


वरिष्ठ पोलिसांचा आदेश सर्व पोलिस ठाणे, गुन्हे शाखे, सर्व पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना पाठवण्यात आला आहे.


2019 मध्ये, प्राणघातक हल्ला प्रकरणातील पीडित व्यक्ती जखमी अवस्थेत चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. पोलिसांनी प्रथम एफआयआर दाखल केला आणि रुग्णालयात जात असताना तक्रारदाराचा हृदयविकाराचा झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिस आयुक्त नगराळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पोलीस बैठकीत नुकतीच या प्रकरणाचीही चर्चा झाली.