ट्वेन्टी 20 मुंबई लीगला सुरुवात, सहा संघांमध्ये टक्कर
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2018 08:16 AM (IST)
या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, तसंच युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हेसुद्धा वेगवेगळ्या संघातून सहभागी होणार आहेत.
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या धर्तीवर ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे. 11 ते 21 मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, तसंच युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हेसुद्धा वेगवेगळ्या संघातून सहभागी होत आहेत. रहाणे, सूर्यकुमारवर सर्वाधिक बोली आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव सगळ्यात महागडे खेळाडू ठरले. रहाणे आणि सूर्यकुमार यांना अनुक्रमे मुंबई नॉर्थ आणि मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक म्हणजे सात लाख रुपयांची बोली लावण्यात आली. रोहित शर्माला सहा लाखांची बोली लावत मुंबई नॉर्थ वेस्ट संघाने विकत घेतलं. तर श्रेयस अय्यरवर मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाने पाच लाखांची बोली लावली.