नवी मुंबई : घणसोली येथील माथाडी कामगार राहत असलेल्या चाळीतील घरांचा क्लस्टर योजनेत समावेश करून त्यांचा पुनर्विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच येथील रखडलेला गावठाण सर्व्हे सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून मराठा तरूणांना कर्जवाटप सुरू केल्याबद्दल माथाडी कामगार व संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या सत्कार समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे माथाडी कामगार चळवळीच्या नावाने खंडणी वसूल केली जात असल्याची तक्रार केली. तसेच खंडणी वसूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी खंडणीखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "माथाडी कामगारांच्या चळवळीला धक्का लागू देणार नाही. माथाडींच्या नावाने ज्यांनी दुकान मांडलं आहे, माथाडी कामगारांना ज्यांनी वेठीस धरलं आहे, अशा लोकांना आम्ही सोडणार नाही. त्यांची गय केली जाणार नाही."