मरिन ड्राईव्हवर कुत्र्याने घाण केली, तर दंडात्मक कारवाई
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2016 09:14 AM (IST)
मुंबई: मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर फिरायला जाण्याची हौस प्रत्येकालाच असते. यात काहींना आपल्या कुत्र्यासोबत फेरफटका मारायला आवडतं. पण हिच हौस आता तुम्हाला महागात पडू शकते. कारण, कुत्र्यांना फिरवायच्या नादात त्याने केलेल्या घाणीकडे हे लोक कानाडोळा करतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून पालिकेने त्या कुत्र्याच्या मालकाकडून 500 रुपयांचा दंड वसूल करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्हवर देश-विदेशातील पर्यटक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येतात. या परिसराची स्वच्छता अत्यंत गरजेची असल्याने महापालिकेचे सफाई कर्मचारी हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, जॉगिंगसाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी येणारे काही नागरिक आपल्यासोबत कुत्र्यांनाही घेऊन येतात. या कुत्र्यांनी ठिकठिकाणी केलेल्या घाणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. तेव्हा मरिन ड्राईव्हची स्वच्छता कायम राहावी आणि स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच पटावे यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.