Maratha Protest in Mumbai: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल पाच दिवस मुंबईत ठाण मांडून बसलेले मराठा आंदोलक मंगळवारी माघारी फिरले. राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडत काल रात्री मुंबई सोडली. मात्र, त्यापूर्वी चार दिवस मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक (CSMT) आणि आझाद मैदानाच्या परिसरात अक्षरश: चक्का जाम केला होता. काल मराठा आंदोलक मुंबईतून निघून गेल्यानंतर आता हा संपूर्ण परिसर खाली झाला आहे. मात्र, आता पोलिसांनी या भागात गर्दी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
मरिन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलिसांकडून बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे आणि दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आंदोलक मुंबईतून निघून गेल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक काही बोलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने अनेक मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानक (CSMT Railway station) आणि आजुबाजूच्या परिसरात आश्रय घेतला होता. एवढेच नव्हे तर अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरिनड्राईव्ह अशी भ्रमंती केली होती. या भागात फिरताना मराठा आंदोलकांचे काही लोकांशी खटके उडाले होते.
दरम्यान, यापूर्वी जुहू परिसरातील एका प्रकरणात मराठा आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी हाणामारीत बसच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आणखी वाचा
मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?