Maratha Aandolan: शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी मातोश्री (Matoshree) येथे आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) वतीनं देण्यात आला होता. त्यानुसार, मराठा आंदोलकांनी (Maratha Aandolak) आज मातोश्रीबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. तर मातोश्रीबाहेर केलेलं हे आंदोलन भाजप पुरस्कृत होतं का असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी उपस्थित केला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाकडून आज मातोश्रीवर झालेला आंदोलन (Maratha Aandolan) हे भाजपचे आंदोलन होतं असा आरोप केला जात आहे. रमेश केरे पाटील यांच्यासह अन्य मराठा बांधवांनी मातोश्रीवर आंदोलन (Maratha Aandolan) केलं. मात्र या आंदोलनावेळी भाजपचा पदाधिकारी देखील त्यांच्यात सामील झाल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या या आंदोलनामध्ये भाजपचा पदाधिकारी सुशील पायाळ देखील सहभागी झाल्याचं दिसून आलं. यावेळी सुशील पायाळ यांनी डोक्यावर एक मराठा लाख मराठा लिहलेली टोपी देखील घातली होती. 


जेव्हा एबीपी माझाने याबाबत त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सुशील पायाळ हे भाजपचे पदाधिकारी असून ते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. मातोश्री बाहेर केरे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामध्ये कल्याणमधील भाजपाचे पदाधिकारी सुशील पायाळ डोक्यावर टोपी घालून आलेले दिसले. पदाधिकारी सुशील पायाळ मराठा समाजाचे नसतानाही मराठा आंदोलनामध्ये सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी बोलताना म्हटलं की, आज मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी गेले आहेत ते सर्वजण भाजपची पिल्लावळ आहेत. माझा हा आरोप आहे. त्यांच्यामध्ये कल्याणमधील एका पदाधिकारी आहे. त्याचं नाव सुशील पायाळ असं आहे. हा पदाधिकारी मराठा समाजाचा नाही. याचा अर्थ भाजपचा हा कुटील डाव आहे. मातोश्रीला अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यात जे मातोश्रीचं, उध्दव ठाकरेंचं आणि महाविकास आघाडीचं चांगलं वातावरण आहे, ते गढूळ करण्याचं काम सुरू आहे असंही हर्षवर्धन पालांडे यांनी म्हटलं आहे. 


तर मराठा समाज या गोष्टींना बळी पडणार नाही. भाजपने आपला कपटी डाव आणि षडयंत्र करणं बंद करावं, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज त्यांना आपली जागा दाखवून देईल अशा विश्वास देखील हर्षवर्धन पालांडे यांनी व्यक्त केला आहे.