Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर आज (29 ऑगस्ट) भगवं वादळ अवतरलं आहे. आझाद मैदान काही मिनिटांमध्येच भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकामी जागी आसरा घेण्यास सुरुवात केली. पावसामुळे आझाद मैदानात आणि बाहेर मराठा आरक्षण आंदोलकांची गैरसोय झाली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले. दरम्यान, मराठा आंदोलकांनी मंत्रालयाकडे सुद्धा मोर्चा वळवत घोषणाबाजी केली. मंत्रालयासमोर शेकडो आंदोलक जमले होते. दरम्यान, काही आंदोलक सीएसएमटी मेट्रो सबवेच्या आत आणि जवळच्या बस स्टॉपवरील शेडखाली उभे राहिले. मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानात पोहोचतील हे माहित असतानाही त्यांनी कोणतीही व्यवस्था केली नाही असा आरोप आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर केला. 

एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी

न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. निदर्शकांची संख्या 5 हजार पेक्षा जास्त नसावी अशीही अट घालण्यात आली आहे. तरीही, राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागले आहेत आणि वातावरण आधीच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. कारण हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. दरम्यान, जरांगे यांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात म्हणून मान्यता मिळावी. कुणबी ही एक कृषी जात आहे जी इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात समाविष्ट आहे. जर मराठ्यांना हा दर्जा मिळाला तर त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळू शकेल.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? 

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

इतर महत्वाच्या बातम्या