मुंबई: तुम्ही मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शिवरायांसमोर शपथ घेतली, नतमस्तक झाला त्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण जोपर्यंत तुम्ही आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं. दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली. तुमची मुदत संपली आहे, आता आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करणार असंही जरांगेंनी (Manoj Jarange) स्पष्ट केलं. 


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये (Shivsena Dasara Melava Speech) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मराठ्यांना आरक्षण देणारच. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही शिवरायांसमोर घेतलेल्या शपथेचा आदर आहे. तुम्ही आम्हाला आरक्षण देणार हे माहिती आहे, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आरक्षण मागतोय. पण जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही लढणारच. 


सणाच्या दिवशी गोडधोड जेवण सोडून लढतोय


मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला काही कामं नाहीत म्हणून आम्ही आलो नाही. निसर्ग साथ देत नाही, कर्ज काढून पोरांना शिकवतोय. पण आरक्षणामुळे त्याला नोकरी मिळत नाही, तो घरात सुशिक्षित बेरोजगार म्हणून राहतोय. आमच्या लेकरांचे आयुष्य पणाला लागलंय. सणाच्या दिवशी गोडधोड जेवायचं सोडून आम्ही आरक्षणासाठी लढतोय, ही आमची वेदना आहे. आमच्या किती पिढ्या बरबाद झाल्या. आमच्या कधीतरी कामाला यावं म्हणून तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही आता अशी भूमिका घेताय.


मराठे अफगाणिस्तानपर्यंत गेले, मग स्वतःच्या पोराच्या आयुष्यासाठी काय करेल याचा विचार करा असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. 


शिवरायांच्या पुतळ्यासमोर झुकून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला


गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं दिसून येतंय. जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या दसऱ्या मेळव्याच्या स्टेजवरूनच एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू असतानाच शिवरायांच्या पुतळ्यासमोर गेले आणि त्या ठिकाणी नतमस्तक झाले. एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देणार असा शब्द दिला. 


ही बातमी वाचा: