मुंबई : मनोज जरांगे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे नेहमीच पालन केलं आहे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उद्या पर्यंत कार्यवाही केली जाईल. पण गेल्या चार महिन्याच्या काळात जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर ही वेळच आली नसती असं आंदोलकांचे वकील अॅड. आशिष गायकवाड म्हणाले. मराठा आंदोलकांना अन्न, पाणी मिळू नये असा प्रयत्न सरकारने केला, त्यानंतर मराठा आंदोलकांनीही त्या अॅक्शनला रिअॅक्शन दिली, त्यांना गावाकडून खाण्याचे साहित्य मुंबईत आले असंही वकिलांनी म्हटलं. म
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर आंदोलकांचे वकील अॅड. आशिष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे यांनी कोर्टाच्या सगळ्या आदेशांचे पालन केलं. जरांगे यांनी या आंदोलनाची घोषणा ही चार महिन्यांपूर्वीच केली होती. पण गेल्या चार महिन्यात सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. जरांगेंनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप वकिलांनी केला.
आंदोलकांना अन्न-पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न
अॅड. आशिष गायकवाड म्हणाले की, "राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी दिली, मात्र आझाद मैदानाच्या आजूबाजूची सगळी दुकाने, हॉटल्स बंद केली. जेणेकरुन मराठा आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये. पहिले दोन दिवस स्वच्छतागृहेही उपलब्ध करुन दिली नव्हती. अशा प्रकारे आंदोलकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यात आलं. आंदोलकांसाठी अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे अपेक्षित होतं. पण तसं करण्यात आलं नाही. त्यानंतर आंदोलकांकडून अॅक्शनला रिअॅक्शन आली. गेल्या चार महिन्यात सरकारने जर मनोज जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता केली असती तर ही वेळ आलीच नसती."
आंदोलनात समाजकंटक घुसवून बदनाम करण्याचा प्रयत्न
अॅड. आशिष गायकवाड म्हणाले की, "कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन करावे असे आदेश मनोज जरांगे यांनी दिले आहेत. काही वाईट गोष्टी या आंदोलनात शिरल्या आणि त्यांचे कृत्य हे व्हायरल करण्यात आलं. वाईट गोष्टी दाखवल्या जात आहेत, पण चांगल्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत. काही समाजकंटक या आंदोलनात शिरले आहेत, त्यामुळे आंदोलन भरकटले जाईल असा प्रयत्न केला जात आहे."
मनोज जरांगे यांचे आंदोलन हे सरकारविरोधात आहे, मुंबईतील सामान्य लोकांच्या विरोधात नाही असं वकिलांनी स्पष्ट केलं. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची भूमिका आहे. उपोषण आमरण असल्याने दररोज अर्ज करणे शक्य नाही. ही बाब आमच्या अर्जामध्ये दिली होती. पण ही गोष्ट सरकारने कोर्टापुढे आणली नाही असा आरोपही त्यांनी केला.
उद्या चार वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
जरांगे पाटील वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे ज्या काही कायद्यात तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते खाली करावेत असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावेत असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
ही बातमी वाचा: