मंजुळा शेट्ये प्रकरणाचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात!
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2017 04:37 PM (IST)
मंजुळा शेट्येचा सीलबंद शवविच्छेदन अहवालही हायकोर्टासमोर सादर करण्यात आला.
मुंबई : भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा अंतिम टप्यात आला आहे. येत्या 20 दिवसांत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहीती क्राईम ब्रांचने मुंबई हायकोर्टात दिली. मंजुळा शेट्येचा सीलबंद शवविच्छेदन अहवालही हायकोर्टासमोर सादर करण्यात आला. तसेच यासंदर्भात स्वतंत्र चौकशी समितीचा अंतिम अहवालही लवकरच सादर करणार असल्याचं राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आलं. मंजुळा ही बाथरूममध्ये असताना तिला चक्कर आली आणि त्यातच पाय घसरून ती पडली, ज्याने तिची शुद्ध हरपली आणि अशातच तिचा मृत्यू झाला, असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात केला, त्याचबरोबर मंजुळाच्या अंगावरील खुणा याही पाय घसरून पडल्याच्या कारणाने झाल्याचंही हायकोर्टात याआधीच सांगण्यात आलं. ज्या डॉ. विश्वेश गोटे यांनी पंचनामा केला त्यांचीही चौकशी सुरू असल्याचं हायकोर्टाला सांगण्यात आलं. जेल प्रशासन आणि क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी असल्याचं सांगत हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांकरता तहकूब केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.