Mangalprabhat Lodha on potholes: मुंबईसह राज्यात पावसाने दैना केल्यानंतर आता रस्त्यांची पार चाळण होऊन गेली आहे. दरम्यान, खड्ड्यातील रस्त्यांसाठी टोल आकारला जाऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. असे असतानाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रस्त्यांवरून आंदोलन करणाऱ्यांना काम नसल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेने काम सुरू केलं असून गणपतीपूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील, असे लोढा यांनी म्हटले आहे.
करायचं काय म्हणून ते आंदोलन करत आहेत
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात. त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही. मग करायचं काय म्हणून ते आंदोलन करत आहेत. जिथं पॅचवर्क निघालं असेल तिथं देखील दुरुस्ती केली जाईल. गणपतीपूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील, असे लोढा यांनी म्हटले आहे.
खड्ड्यांवरून मनसे आक्रमक
दरम्यान, मुंबईत रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेकडून आज चांदिवलीमध्ये आंदोलन करण्यात आले. एनएसएस रोडवर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून मनसेनं आंदोलन केले. स्थानिक नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत, आणखी होऊ शकतात याचे प्रतीकात्मक रूप म्हणून जखमी कार्यकर्त्यांना उभं करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आता जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला.
रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा
दरम्यान, रस्ते बांधकामाचे टेंडर काढा, रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा, हा नवा धंदा सुरू झाला आहे' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका केली. शिवतीर्थवर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्यांवरून जोरदार टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुंबई शहर नियोजनाचा लघुआराखडा सादर करत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज यांनी सांगितले. राज म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ते मुख्यमंत्र्यांशी शहर नियोजनासह विविध विषयांवर संवाद साधत आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीतील अडचणी, अनधिकृत पार्किंग यांसारखे गंभीर मुद्दे असले तरी, या भेटीत वाहतुकीसंदर्भात विशेष चर्चा झाली. प्रेझेंटेशनवेळी वाहतुकीसंदर्भातील पोलिस आयुक्तही उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या