मुंबई : एकीकडे 'मीटू' चळवळीमुळे देशभरातून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत गर्दीने गजबजलेल्या रेल्वे स्थानकावरच चिमुरड्या सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. मुंबई सेंट्रल स्थानकावर एका विकृताने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल या गजबजलेल्या स्थानकाच्या फूटओव्हर ब्रिजवर दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमुळे उजेडात आला. दोन विद्यार्थिनी ब्रिजवर गप्पा मारत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी हातात मोठ्या पिशव्या घेऊन आला. पिशव्या बाजूला ठेवून तो दोघींच्या दिशेने आला आणि त्याने एका विद्यार्थिनीला नकोसा स्पर्श केला.

या प्रकारानंतर चिमुरडी विद्यार्थिनी चकित होऊन आरोपीकडे पाहत राहिली. मात्र काही झालंच नाही, अशा आविर्भात आरोपी निर्लज्जपणे, संथ गतीने तिथून निघून गेला. ही घटना घडली, त्यावेळी ब्रिजवरुन अनेक प्रवासी ये-जा करत होते, मात्र कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आरोपीचं चांगलंच फावलं.

सुदैवाने, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र भरगर्दीत, दिवसा-उजेडी घडलेल्या या प्रकारामुळे आपल्या मुली किती सुरक्षित आहेत, अशी भीती पालकांच्या आल्यावाचून राहणार नाही.