मुंबई: मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी (ता २४) संध्याकाळी ट्रेनमधून धक्का लागल्याच्या रागातून आलोक सिंह (वय ३१) या प्राध्यापकाचा पोटात धारदार चिमटा भोसकून खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे या तरुणाला अटक केली होती. आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात मालाड स्थानकात (Malad Station) ट्रेनमधून उतरताना वाद झाला होता. हे भांडण इतके विकोपाला गेले की ओंकार शिंदे याने त्याच्याकडील धारदार चिमटा आलोक सिंह (Alok Singh) यांच्या पोटाजवळ खुपसला होता. हा वार खोलवर गेला आणि आलोक सिंह यांच्या किडनीजवळ गंभीर इजा झाली. यानंतर त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपासादरम्यान शिक्षकाच्या हत्येत वापरण्यात आलेला चिमटा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.(Malad Station Stabbing Case)

आरोपी ओंकार शिंदेने पळताना चिमटा आरओबीवरून फेकून दिला होता. मालाड रेल्वे स्थानक परिसरातूनच पोलिसांनी चिमटा जप्त केला आहे. शनिवारी २४ तारखेला लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून आलोक सिंह नावाच्या शिक्षकाची हत्या झाली होती. आरोपी ओंकार शिंदेने हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात भोसकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.(Malad Station Stabbing Case)

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ओंकार शिंदेंने हल्ल्याच्या मागचे कारण सांगितले आहे. एनएम महाविद्यालयात प्राध्यापक असलेले आलोक कुमार हे शनिवारी चर्चगेटहून मालाडला येत होते. “महिलांच्या समोर मला ढकलले आणि माझा अपमान केला, म्हणून मला राग आला”, असे आरोपी शिंदेने म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, ओंकार शिंदे स्वभावाने तापट आहे. ओलाककुमार यांना फक्त दुखापत करण्यासाठी चिमट्याच्या सहाय्याने आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्यांचा मृत्यू झाला, ही बाब त्याला अटक होईपर्यंत माहीत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोककुमार सिंह यांच्या पुढे त्या ट्रेनमध्ये दोन महिला उभ्या होत्या. तसेच त्यांचा व्याख्याता मित्र होता आणि या सर्वांच्या मागे ओंकार शिंदे उभा होता.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी ओंकार शिंदेने आलोककुमार यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आलोककुमार सिंह यांनी ओंकारला मागे ढकलले आणि पुढे महिला उभ्या आहेत, हे तुला दिसत नाही का? असे सांगितले. यावरून आरोपी ओंकारला अपमानित झाल्यासारखे वाटले. हा प्रसंग सांगतानाही ओंकार प्रचंड रागावलेला होता. त्याच्या वडिलांनीही तो रागीट स्वभावाचा असल्याचे मान्य केले आहे.

वाद झाल्यावर बॅगेतून चिमटा काढला अन्...

मालाड स्थानक येण्यापूर्वी झालेल्या वादानंतर ओंकार शिंदेला त्याच्या बॅगेत इमिटेशन ज्वेलरीचे काम करण्यासाठी वापरला जाणारा चिमटा असल्याचे लक्षात आले. त्याने बॅगेतील चिमटा बाहेर काढला आणि आलोककुमार सिंह यांना चिमटा खुपसवून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी सांगितले की, आलोककुमार यांची हत्या करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबताच आरोपीने आलोककुमार यांना चिमटा मारून तिथून पळ काढला. त्याला वाटले की, आलोककुमार कदाचित त्याचा पाठलाग करून त्याला पकडतील. मात्र, आलोककुमार यांचा आपल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, याची आरोपी ओमकारला कोणतीही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आला आणि त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.