मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये (Malad News) शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी (Dindoshi News) दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी एका गोदामात लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि आता या आगीने भीषण स्वरुप धारण केले आहे. ही आग वेगाने पसरत असून त्यामुळे आकाशात काळ्या धुराचा प्रचंड लोट उठल्याचे पाहायला मिळत आहे. धुराचे हे लोट लांबच्या अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन या आगीची तीव्रता लक्षात येऊ शकते. (Fire in Mumbai)
सकाळी 11 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची वर्दी मिळताच अग्मिशमन दलाच्या (Fire brigade) चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागलेल्या भागात आजुबाजूला मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर सध्या दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूचा परिसर खाली केला जात आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत फर्निचरची गोदामं जळून खाक झाल्याने मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आग वेगाने पसरु लागल्यानंतर या परिसरातील रहिवाशांची पळापळ सुरु झाली. या परिसरातील एका हॉटेलजवळ गॅस सिलिंडर असलेल्या काही गाड्या उभ्या होत्या. या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास स्फोटांची मालिका सुरु होऊ शकते. त्यासाठी पोलिसांकडून सिलेंडरच्या या गाड्या हटवण्यासाठी धावपळ सुरु आहे. या भागात रांगेत फर्निचरची अनेक दुकाने आहेत. आगीने भीषण स्वरुप धारण केल्यानंतर या दुकानांना आगीची झळ जाणवू लागली. आगीच्या धगीने अनेक दुकानांमधील काचा तडकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधील साहित्य इतर ठिकाणी हलवायला सुरुवात केली आहे. सध्या खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याठिकाणी रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीव धोक्यात घालून आग विझवण्याचे प्रयत्न
खडकपाडा येथे लागलेली आग खूप मोठी आहे. मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या दुकान आणि आजूबाजूला असलेली झोपडपट्टीमुळे आग वाढली आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या याठिकाणी पोहोचल्या आहेत. आग विझवायचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, फर्निचरच्या दुकानांमधील लाकडाच्या साहित्यामुळे आग भडकत आहे. आत्तापर्यंत आठ ते दहा फर्निचर दुकान जळून खाक झाली आहेत. तब्बल दीड तासांपासून ही आग धुमसत आहे. याठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आगीच्या ज्वाळांपासून अगदी काही अंतरावर उभे राहून जीव धोक्यात घालून पाण्याचा मारा करत आहेत.
आणखी वाचा