Continues below advertisement


मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी (Marathi) माणसांची संख्या कमी होत असून अमराठी किंवा परप्रांतीयांची संख्या वाढत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. राजकीय वर्तुळातचही यावरुन नेहमीच वाद-विवाद आणि मंथन होते. त्यातच, गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील शाळांमध्ये त्रि-सुत्रीय भाषा धोरण अवलंबण्यावरुन चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला होता. मनसे आणि शिवसेनेनं मराठीचा मुद्दा उपस्थित करत या धोरणास विरोधही दर्शवला. तर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याची टीका सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांनी केली. आता, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh manjarekar) यांनी पुन्हा एकदा मुंबईतील (Mumbai) मराठी माणसांचा टक्का कमी होत असल्याबद्दल मनातील खंत व्यक्त केली.


मुंबईत मराठी रंगभूमीचा मानाचा समजला जाणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुलुंड शाखेच्यावतीने 11 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना "कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार" प्रदान करण्यात आला. तसेच, ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि अभिनेत्री अंजली वकसंगकर यांनाही "कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी बोलताना अभिनेता महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठी माणसांचा टक्का कमी झाल्याची खंत व्यक्त केली.


मुंबईमध्ये मराठी पण कमी होत आहे, जे थोडं फार टिकलं आहे ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे. आता, शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही, असे म्हणत अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठा टक्का कमी झाल्याने चिंता व्यक्त केली आहे. महेश मांजरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. मात्र, शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना-मनसे, राज आणि उद्धव ठाकरेंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसैनिकांचा आणि मनसैनिकांचं हक्काचं ठिकाण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यासमोर आहे. मात्र, आता शिवाजी पार्क परिसरातही मराठी माणूस उरला नाही, अशा शब्दात महेश मांजरेकर यांनी खंत व्यक्त केल्याने हा गंभीर विषय असल्याचे लक्षात येईल.


मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावर बनवलेला सिनेमा


महेश मांजरेकर हे नेहमीच मराठीसाठी आग्रही असतात, मराठी कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून ते प्रयत्नशील असतात. तसेच, मराठी सिनेमांचे दिग्दर्शन आणि मराठीच्या मुद्द्यावरही ते सिनेमे बनवतात. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय... हा मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावर आधारित त्यांचा चित्रपट प्रचंड गाजलाही होता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मराठीजनांच्या मुंबईतील कमी होत चाललेल्या लोकसंख्येवर भाष्य केलंय.


हेही वाचा


मुंबईकरांना गुडन्यूज, नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर आता केवळ अर्ध्या तासात; महामार्गातील मोठा अडथळा दूर