मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेसंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

ही परीक्षा दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे पार पडणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा एबीपी माझाने केला होता. त्यानंतर प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेत भरती प्रक्रिया स्थगित केली होती. आता ती परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.

SRPF Exam Controversy : 100 पैकी 85 प्रश्न खासगी पुस्तकातून 

2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत आल्याचे निदर्शनास आलं.

या प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

SRPF Exam Investigation Orders : पोलीस उपमहानिरीक्षकांकडून सखोल चौकशीचे आदेश

एबीपी माझाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

SRPF Exam Re Exam Date : 24 मे रोजी स्वामी चिंचोळी येथे पुनर्परीक्षा

नवीन वेळापत्रकानुसार एसआरपीएफ गट 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुनर्परीक्षेमुळे उमेदवारांना न्याय मिळेल आणि भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SRPF Statement : एसआरपीएफकडून अधिकृत स्पष्टीकरण

एसआरपीएफ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माध्यमांमधून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतल्याचं नमूद केलं आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा: