Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवटांच्या अडचणीत वाढ, जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन, अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन सरकारचा मोठा निर्णय
Rajendra Ghanwat : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर महसूल व वन विभागानं शासन निर्णय जारी करत राजेंद्र घनवट यांच्या जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलीय.

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पार्टनर राजेंद्र पोपट घनवट आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेल्या तक्रारीवरुन महसूल व वन विभागानं निर्णय घेत जीआर प्रसिद्ध केला आहे. या एसआयटीमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त एसआयटीचे प्रमुख, सोबतच नोंदणी महानिरीक्षक, जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख आणि पुण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश असेल.
घनवट ॲग्रो लिमिटेडच्या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झालेत.घनवट यांच्याशी संलग्न संस्था, कंपन्या यांचेसाठी अकृषिक कारणांसाठी वर्ग केलेल्या जमिनी, बाजारभावापेक्षा कमी मोबदला रक्कम देऊन खरेदी झालेल्या जमिनींची चौकशी, अनुसूचित जमाती खातेदारांच्या जमिनी, महार वतन तसेच नवीन शर्तींच्या जमीनींच्या खरेदी व्यवहारांमध्ये किती प्रकरणात विनापरवानगी खरेदी व्यवहार झालेले आहेत यासंदर्भात चौकशी होणार आहे.
सोबतच, घनवट ॲग्रो फुड्स तर्फे संचालक पोपट घनवट यांच्या नावे झालेल्या खरेदी व्यवहारांची तपासणी देखील एसआयटी करणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काही शेतकरी अंजली दमानिया यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, राजेंद्र घनवट हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पार्टनर असून आर्थिक देवाणघेवाण यात झाल्याचा दमानियांचा आरोप होता.
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चौकशीच्या मागणी केली होती. बैठकीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांच्या विरोधात एसआयटी लावून 30 दिवसाचा आत मध्ये चौकशी करू असं आश्वासन दिलं होतं.
पोपट घनवट आणि राजेंद्र घनवट यांचा मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये कुठे कुठे जमिनी आहे,याची चौकशी करून त्यांनी खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत का याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिलं होतं.यानंतर आज एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
इतर बातम्या :




















