मुंबई : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण डोंबिवलीमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी परिपत्रक काढून सुट्टी जाहीर आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ठाणे जिल्ह्याला ४ आणि ५ तारखेला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर उद्या महापालिका,नगरपरिषद जिल्हा परिषद, खाजगी यासह सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्या (४ जुलै) सर्व शाळा आणि अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील शाळांना सुट्टी
उद्या म्हणजेच 4 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेवून नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महानगरपालिका आणि खाजगी अशा सर्व शांळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघरमध्ये 4 जुलै रोजी शाळांना सुट्टी
पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून उद्या जिल्हा प्रशासनाकडून शाळा , महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमध्ये उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यानं अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
भिवंडीत मुसळधार पावसाचा इशारा; 4 जुलै रोजी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण विभागाने 4 जुलै 2026 (शनिवार) रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या राज्य मंडळ, CBSE, ICSE, IGCSE तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना लागू राहणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालय प्रशासनाने पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी ४ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवार, 4 जुलै 2026 रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
