मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत उमेदवारांना उपलब्ध असलेले ‘ऑप्टिंग आऊट’ तसेच ‘संमती’ (Give Up / Accepted) हे पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाने जारी केले आहे.

आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट’ ही संकल्पना लागू केली होती. त्यानुसार निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, या पर्यायासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांसाठी भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (Opting Out) तसेच संमती (Give Up / Accepted) देणे हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत.

एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी राहणार नाही.  बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवाराला ज्या पदावर अगोदरच नियुक्ती मिळाली आहे अशा पदाचा किंवा निम्न पदाचा पर्याय उमेदवाराने पसंतीक्रमात दिल्यास त्याचा त्या पदावरील किंवा निम्न पदावरील शिफारशीसाठी विचार केला जाणार नाही.

हा निर्णय प्रसिद्धीपत्रकाच्या दिनांक १३ मे २०२६ पासून अमलात येणार असल्याचे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

MPSC चं महाराष्ट्र काँग्रेसला उत्तर

महाराष्ट्र काँग्रेसनं महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षबाबत एक ट्वीट केले होते ते ट्वीट पुढील प्रमाणे, महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व  PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी  व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत. या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्वीटला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं उत्तर दिलं आहे. आयोगामार्फत शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार दर्शविण्यात आला आहे. यास्तव आयोगाकडून उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या बातमीमध्ये तथ्य आढळून येत नाही.