Shivsena Prabhadevi Clash : प्रभादेवीत मध्यरात्री  झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आमची बाजू ऐकली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना मारहाण झाली होती. तेलवणे यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने  गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत यांनीदेखील स्टॉल लावला होता. विसर्जनाच्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वाद झाला होता. त्यावेळी हा मिटवला. मात्र,  महेश सावंत यांचा राग असल्याने त्यांनी रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह 20 ते 25 कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह आले असल्याचे संतोष तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


महेश सावंत यांनी शिविगाळ केली आणि अंगावर धावून आले. सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या दरम्यान पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली असल्याची तक्रार तेलवणे यांनी केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, यशवंत विचले यांच्यासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


कोणावर गुन्हा दाखल?


शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पड्याचील यांच्यासह इतर काही अज्ञातांविरोधात भारतीय दंड कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 आदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: