पालघर : संपूर्ण पालघर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागत आहे. परंतु असं असूनही पालघरसाठी असलेले दहा व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी असलेले व्हेंटिलेटर ठाणे का दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेने मृत्यूदर वाढत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असून जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना वणवण करावी लागत आहे. परिणामी या रुग्णांना जिल्ह्याबाहेर हलवल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्ण जिल्ह्याबाहेरची वाट धरत आहेत. पालघर जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर वाढवण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत असून जिल्हा प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे. परिणामी जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. व्हेंटिलेटर अभावी वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असताना सुद्धा जिल्ह्यासाठी असलेले व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याने कशी काय पळवली असा प्रश्न विचारला जात आहे.
वसई विरार हा शहरी भाग असो की पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग संपूर्णपणे सगळा जिल्हा कोरोनाने वेढला आहे. या संपूर्ण पट्ट्यात मृत्यू दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना प्रशासनाने ठाणे जिल्ह्याचाही विचार करायला हवा यात दुमत नाही. पण पालघर जिल्ह्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात बेड शोधावे लागत आहेत अथवा आपला जीव गमवावा लागत आहे. असे असताना आधीच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या कमी असताना ठाणे जिल्ह्याला का पाठवण्यात आली या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? निष्पाप लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असताना कोणाच्या दबावाखाली आरोग्य यंत्रणेने आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 89 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील हे 10 व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला का देण्यात आली किंवा राजकीय दबावापोटी देण्यात आली का याबाबत सांशकता आहे.
प्रशासनाने जर व्हेंटिलेटर ठाण्याला दिली असतील तर ते चुकीचे आहे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. आपल्या इथल्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असताना दुसऱ्यांना देणे हे अत्यंत गैर आहे, अशी प्रतिक्रिया पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.
तर आपण ठाणे जिल्ह्याचा दुसरी काही मदत केली नाही. वरिष्ठांनी आदेश दिले म्हणून व्हेंटिलेटर पाठवावी लागली, असं पालघरचे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितलं.