MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
MH CET Scam : एमएच-सीईटी परीक्षा डेटा लीक आणि परीक्षा केंद्र मॅनेजमेंटप्रकरणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याप्रकरणी FIR दाखल करून फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

MH CET Data Leak Scam : एमएच-सीईटी (MH-CET) परीक्षेशी संबंधित विविध गंभीर समस्या आणि घोटाळ्यांचे आरोप घेऊन राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी तब्बल एक तास सविस्तर चर्चा केली. सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांचा डेटा कसा लीक केला जातो आणि थेट परीक्षा केंद्रे (Exam Centers) कशी मॅनेज केली जातात, याचा संपूर्ण पुरावा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. या सर्व प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Devendra Fadnavis Action On MH CET : मुख्यमंत्र्यांचे 4 मोठे आदेश
शिक्षकांनी मांडलेल्या सर्व संशयास्पद बाबींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत:
फॉरेन्सिक ऑडिट : ज्या ज्या परीक्षा केंद्रांबाबत (Centers) घोटाळ्याच्या किंवा संशयाच्या तक्रारी आहेत, अशा सर्व केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) केले जाईल.
FIR आणि सहपोलीस आयुक्तांमार्फत तपास : या प्रकरणी केवळ एनसी (NC) न राहता थेट एफआयआर (FIR) दाखल केला जाईल आणि सहपोलीस आयुक्त (Joint CP) दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.
डेटा लीकची सखोल चौकशी : सीईटी सेलच्या डेटा लीकप्रकरणी कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करून त्याचाही तपास पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली होईल.
दोषींवर कठोर कारवाई : या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळतील, मग ते सरकारमधील असोत वा खाजगी क्षेत्रातील, कोणाचीही गय केली जाणार नाही.
MLA Vikram Pachpute Statement : "संशयास्पद बाबींमध्ये बदल होणे गरजेचे"
भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, "आमची मुख्यमंत्र्यांसोबत एक तास चर्चा झाली. शिष्टमंडळाने ज्या शंका उपस्थित केल्या त्या मुख्यमंत्र्यांनाही संशयास्पद वाटल्या. त्यामुळे यात बदल होणे गरजेचे आहे. लोअर परळ येथील तक्रारीचे एफआयआरमध्ये रूपांतर करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन केली जाईल."
MH CET Delegation Allegations : ब्लॅकलिस्टेड कंपनीकडे काम
शिष्टमंडळातील प्रतिनिधी नारायण शिनगारे आणि विवेक डोके यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांची यादी सुपूर्द केली. त्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांकडून 10 लाख ते 15 लाख रुपये घेऊन थेट परीक्षा केंद्रे मॅनेज केली जातात. भंडारा, जालना, गोंदिया यांसारख्या मागास जिल्ह्यांमध्ये धक्कादायक रीतीने टॉपर येत असून ते नंतर गायब असतात. परीक्षा आयोजित करणारी 'एज्युस्पार्क' (Eduspark) ही कंपनी बिहारमध्ये आधीच ब्लॅकलिस्ट झालेली आहे. ही कंपनी रुस्तम केरावाला आणि कविता केरावाला (VIBGYOR शाळांचे संचालक) यांच्याशी संबंधित आहे.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आता मुंबई पोलीस या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावले उचलणार आहेत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















