दीपक सावंत राजीनामा देणार, रिक्त मंत्रिपदासाठी सेनेचं लॉबिंग
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2019 11:44 PM (IST)
डॉ. दीपक सावंत आरोग्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून त्यानंतर रिकामं होणारं मंत्रिपद पटकावण्यासाठी शिवसेनेच्या विद्यमान आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फाईल फोटो
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दोन दिवसात राजीनामा द्यावा लागणार आहे. सावंत यांचा आमदारकीचा कालावधी संपून सात जानेवारीला सहा महिने होत असल्यामुळे त्यानंतर ते मंत्रिपदी राहू शकत नाहीत. शिवसेनेने यावेळी दीपक सावंतांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नव्हती, त्यांच्या जागी विलास पोतनीस हे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे दीपक सावंत सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. नियमानुसार कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना सहा महिन्यांपर्यंत मंत्रिपदी राहता येते. त्यानंतर पुन्हा जर मंत्रिपद हवं असेल, तर राजीनामा देऊन नव्याने शपथविधी करावा लागतो. डॉ. दीपक सावंत यांना आरोग्यमंत्रिपदी परतायचं असेल, तर त्यांना नव्याने शपथ घ्यावी लागेल. मंत्रिपदाच्या नव्या कालावधीत पुन्हा आमदारकी पदरात पाडून ते मंत्रिपद पुढच्या निवडणुकीपर्यंत कायम राखू शकतात. सावंतांच्या राजीनाम्याने रिकामं होणारं मंत्रिपद पटकावण्यासाठी शिवसेनेच्या विद्यमान आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.