मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या समितीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह शासकीय अधिकारी आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश आहे. विनोद पाटील यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
शासन निर्णयात काय म्हटलं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री महोदयांनी असे आश्वासन दिले की, "आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहीत करुन तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल, आणि याकरीता आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल." त्यानुसार पर्यटन विभागास नोडल विभाग म्हणून निदेशित केले आहे.
महाराजांच्या आग्रा येथील मुक्कामी असलेल्या नजरकैदेतील वास्तूच्या /स्थळाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी सदर ठिकाणी ऐतिहासिक पुराव्यासह जागा निश्चिती आणि भव्य स्मारक उभारण्यासह इतर बाबींकरिता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
समितीत कोण?
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे या समितीचे अध्यक्ष असतील. राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, पर्यटनराज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे मुख्य सचिव, व्यवस्थापकीय संचालक, म. प. वि. म, संचालक, पर्यटन संचालनालय, मुंबई, संचालक, पुरात्तव व वस्तूसंग्रहालये संचालनालय, मुंबई, इतिहासतज्ज्ञ म्हणून विक्रमसिंह मोहिते,डॉ. केदार फाळके,ॲड.मारुती आबा गोळे, सुधीर श्रीरंग थोरात या समितीत सदस्य म्हणून असतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे महाव्यवस्थापक हे या समितीचे सचिव असतील.
समितीची कार्यकक्षा
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्रा येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यकतेनुसार पाहणी करुन ऐतिहासिक पुराव्यासह स्थळ निश्चित करणे. स्मारकाची संकल्पना (थीम), प्रकल्प निश्चित करणे आणि शिखर समितीकडे सादर करणे.
विनोद पाटील काय म्हणाले?
गेल्या तीन वर्षांपासून आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणाऱ्या विनोद पाचील यांनी समिती स्थापन केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.विनोद पाटील म्हणाले की, राज्य सरकारचे मनापासून आभार ! विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक धन्यवाद… जेव्हा आम्ही आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करत होतो, त्या ऐतिहासिक क्षणी माझ्या मागणीवरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची ग्वाही दिली होती. आज त्या वचनाची पूर्तता होताना पाहून खूप आनंद होत आहे, असं विनोद पाटील यांनी म्हटलं.
विनोद पाटील पुढं म्हणाले, हे आपल्या सर्व शिवभक्तांच्या मनातील वर्षानुवर्षांची तीव्र आस आणि स्वराज्याची प्रेरणा पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन हे ऐतिहासिक शिवस्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! जय भवानी ! जय शिवाजी !!