Eknath Shinde At Mantralaya : राज्यातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले. मुख्यमंत्री शिंदे आज अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली आहे. पहाटेपासून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री यांच्या खुर्चीच्या मागे आता लावण्यात आली आहे. शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील पूजेसाठी शिंदे समर्थक आमदारही उपस्थित आहेत. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर असे आमदार मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी मंत्रायलात सुरक्षा व्यवस्था देखील तगडी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वेलकमची जोरदार तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
यावेळी आमदार सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्री आज मंत्रालयातील कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. आम्हाला याचा आनंद आहे. सर्वजणांना बोलवण्यात आलं आहे. त्यापैकी ज्यांना शक्य आहेत ते यातील. इतर आमदार मतदारसंघात आहेत, असं त्यांनी सांगितलं.
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजप आणि शिंदे गटात खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आणि शिंदे गटाला प्रत्येकी 3 आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. त्यानुसार शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 25 पेक्षा अधिक मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, शपथविधी झाला तरी मंत्रिमंडळात दोन्ही बाजूंकडून 3 ते 4 मंत्रिपदं रिक्त ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.