Ajit Pawar : मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचं असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 


केंद्राकडे अजूनही जीएसटीची थकबाकी


मार्च 2022पर्यंत राज्याकडे येणारे जीएसटी रक्कम 29 हजार 600 कोटी रुपये होती पैकी 14 हजार कोटी रुपये राज्याला दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्याला केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये मिळणे अजूनही बाकी आहे. ही रक्कम मिळाल्यास आम्हाला विकास कामासाठी खर्च करता येतील असे त्यांनी म्हटले. दरम्यान, केंद्र सरकारने एकूण 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला आहे. यात महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. 21 राज्यांचा मिळून एकूण 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून वितरित करण्या आला. 


ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न


मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यांत देखील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


राज्यसभा निवडणूक


भाजपचे दोन उमेदवार, महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक असे 5 उमेदवार निवडून येणार आहे. आता सहाव्या जागेच चित्र 3 तारखेला स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला अतिरिक्त मतांचा कोटा हा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या अटकेत असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.