मुंबई : राज्यात लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यावर या लसीकरणाचा अतिरिक्त भार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन आणि काँग्रेस आमदारांचे वेतन असा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राष्ट्रवादीकडून दोन कोटींची मदत देण्यात आली आहे.


राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 


महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या संकटाला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या संकटासोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 


पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजित पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.