मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.


मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या 20 गाड्या चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या आहे. 


Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ


काल तब्बल 47 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. राज्यात काल तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. काल नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2457494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 389832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.


Maharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री 
दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.