मुंबई : मतदार तर मतदानासाठी बाहेर पडले होते, पण त्यांना चार-चार तास रांगेत ताटकळत राहावं लागलं, त्यामुळे अनेक ठिकाणी मतदार मतदान न करताच परत गेल्याच्या घटना मुंबईत घडल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी संथ गतीने राबवलेल्या प्रक्रियेमुळे मतदानाचा टक्का घसरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. याच मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीच्या मुंबईतील सर्व उमेदवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली


मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान संथगतीने झालं. त्यामुळे मतदानाचा टक्कासुद्धा त्यामुळे घसरला. शिवाय अनेक ठिकाणी मतदारांसाठी पाण्यासारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात  चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. 


मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठं षडयंत्र - अंबादास दानवेंचा आरोप


पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठं षडयंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
  
मतदानापूर्वी भाजप आणि गद्दार उमेदवारांनी पैसे वाटप केले. भांडूप मध्ये अशी घटना उघड झाल्यावर राज्याचे गृहमंत्री तेथे पोहचले होते असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी  शाई लावली. राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय झाले असेल, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. 


श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली? 


निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली?  सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग व पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत निःपक्षपातीपणे उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.


ही बातमी वाचा: