Sanjay Raut : मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे राज्यातील गृह विभागाकडेदेखील अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलीस सतर्क असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही. अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. राज्यातील यंत्रणा,नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील. तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला. राज्यातील पोलीस योग्य पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.


गृह विभागही सतर्क, पोलिसांना कारवाईच्या सूचना


राज्यात उद्या परराज्यातील लोक येणार असून कायदा सुव्यव्सथा मुद्दा बिघडू शकतात अशी शक्यता आहे. अशा प्रकारचा अहवालही गृह विभागाला मिळाला  आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना गृह विभागाने दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. या कारवाईसाठी कोणाच्या आदेशाची प्रतिक्षा करू नये अशा सूचना गृहविभागाने पोलिसांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द


दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. पोलीस महासंचालकांनी सांगितले की, आम्ही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या आहेत. राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 15 हजारांहून अधिकजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीसी कलम 107,110,151,151 (3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर, 13 हजारांहून अधिकजणांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.