मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे (Liquor) आदेश दिले होते. त्यामुळे, मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारुची दुकाने, बार बंद ठेवण्यात आले. राज्यातील 48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर, शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान झाले. त्यामध्ये, मुंबईसह (Mumbai) परिसरातील 13 लोकसभा मतदाररसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात हे मतदान झाले. त्यामुळे, येथील वाईन शॉप, दारु दुकाने, पब बंद ठेवण्यात आले होते. आता, 4 जून रोजी मतमोजणी (Voting Result) होत असून त्यादिवशीही दारु दुकाने, वाईन शॉप व पब बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी, दुकानमालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 


मुंबईतील मतदान प्रक्रियेदरम्यान 20 मे च्या दोन दिवस आधीच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे, मुंबईत 3 दिवस दारु दुकाने बंद ठेवण्यात आली होता. याचा फटका विक्रेत्यांना बसल्याने आता 4 जून रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पण, तत्काळ यावर निकाल दिला नसून 24 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे. 


24 मे रोजी होणार सुनावणी


मुंबई उच्च न्यायालयात मेसर्स इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड.विणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्यामार्फत दोन स्वंतत्र याचिका केल्या आहेत. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यातच, न्यायालयाने आज ही याचिका दाखल करुन घेतली आहे. मतमोजणीच्या दिवशी  'फुल ड्राय डे'ला आव्हान देणारी  मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टी कालिन खंडपीठाने दाखल करून घेतली. न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावनी 24 मे रोजी ठेवली आहे. देशात 4 जूनला संपूर्ण दिवस दारूबंदी न करता ती निकालापर्यंतच असावी, अशी मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे. त्यामुळे, 24 मे रोजी हायकोर्ट काय आदेश देणार, याकडे सर्व तळीरामांचे लक्ष लागले आहे.


काय म्हणाले जिल्हाधिकारी


20 मे रोजी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात पार पडलेल्या मतदानाच्या दोन दिवसआधीपासूनच दारुची दुकाने बंद व बार ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता. त्यानुसार दारुची दुकाने व बार बंद होते. मात्र, आता 4 जूनला मतमोजणी आहे. त्यादिवशी संपूर्ण दिवस दारुबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. पण,  हे आदेश केवळ मतमोजणीपर्यंत असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी त्यास नकार दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत, त्यात बदल करता येणार नाही, असं उत्तर जिल्हाधिकारी यांनी याचिकाकर्त्यांना दिलं. त्यामुळे, याचिकाकर्त्यांनी न्यायलयात धाव घेतली.  


याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे 


- भारतीय व परदेशी दारु विकण्याचा अधिकृत परवाना असोसिएशनच्या सदस्यांकडे आहे.
- आम्ही रितसर सरकारला कर देतो. तरीही बार संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात.
- शहरात बनावट दारु विक्री करणारे अनेकजण आहेत. त्यांच्यावर काहीच निर्बंध नसतात.
- ड्राय डेला बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत असतो. त्यांचा नफाही चांगला होता.
- रायगड जिल्ह्यात मतदानाचा निकाल जाहिर होईपर्यंतच दारु बंदी आहे. तसे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- मुंबईतही अशाच प्रकारचे आदेश न्यायालयाने द्यावेत.