मुंबई : "ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये," अशी मागणी ओबीसी कल्याणमंत्री आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे सरकार त्यासाठी अनुकूल आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकात अपेक्षित आहेत. त्यातच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या गंभीर बनला आहे. आता या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी सरकारमधील नेत्यांनीच केली आहे.
"या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. मी आणि छगन भुजबळ या चर्चेमध्ये होतो. जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका आम्ही स्पष्ट मांडली. ही चर्चा सकारात्मक झाली. त्यासाठी सरकार अनुकूल आहे. कोणाकडून कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत या निवडणुका होऊ नये आणि आम्ही मंत्री असलो तरी निवडणुका होऊ देणार नाही, ही आमची भूमिका आहे," अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
याआधी पंकजा मुंडे यांनीही ही मागणी केली होती. आता सरकारमधील ओबीसी नेत्यांनी हीच भूमिका घेतली आहे. शिवाय मंत्री असलो तरी या निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशाराच वडेट्टीवार यांनी दिला.
वडेट्टीवारांच्या मागणीला समर्थन देणार नाही : हरिभाऊ राठोड
"या मागणीला समर्थन देणार नाही. त्यांनी चुकीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण अधिकार दिले आहेत. तुम्हाला इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी एक आयोग निर्माण करायला सांगितला आहे. मग तुम्ही केंद्रकडे बोट दाखवता, मोर्चे काढता अशा पद्धतीने मुद्दा भरकटवता आणि आम्ही ओबीसींचे नेते आहोत हे दाखवता हे मंत्र्यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
सुप्रीम कोर्टाने सांगितलेला तज्ज्ञ लोकांचा आयोग नेमून दोन महिन्यांची मुदत द्या. आयोगाला पूर्ण अधिकार द्या, त्यासाठी पैशांची तरतूद करा, असंही ते म्हणाले.
ओबीसी नेत्यांचं 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात शिबीर
दरम्यान ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी लोणावळा इथे 26 आणि 27 जून रोजी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार असून सांगता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. या शिबिरासाठी संजय राठोड, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. तसंच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहेत.