मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दणका दिला आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव काळात जमा होणाऱ्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यलयाकडून तीन निरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामध्ये आर एच कुंभार, एस थोरगव्हाणकर, गोपु नटराजन या तिघांचा समावेश आहे. यासंदर्भातील आदेश लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला 16 ऑगस्टला दिले गेलेत.

दानपेट्यांमधील रक्कम आणि दागिन्यांच्या लिलावावेळी गैरकारभार होत असल्यानं या गोष्टी पारदर्शक व्हाव्यात, यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर पाठपुरावा करत होते.

काय आहेत आदेश

गणेशोत्सव काळातील दानपेट्या या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नेमणूक केलेल्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली उघडून त्यातील रकमेची मोजदाद करावी आणि ती रक्कम टृस्टचे खात्यात ताबडतोब जमा करावी.

गणेशोत्सव काळातील सुवर्णालंकार आणि इतर वस्तूंचा लिलावही निरीक्षकांच्या देखरेखीखाली करून तात्काळ ही रक्कम टृस्ट खात्यात जमा करावी.

गणेशोत्सव काळातील जमा खर्चाचा वेगळा तपशील 10 दिवसांच्या आत मंडळाने धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर करावा.