Kuwait Fire : कुवेतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता कुवेतमधून (Kuwait) 45 भारतीय नागरिकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विमान मायदेशात परतलं आहे. या दुर्घटनेत मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या डेनी बेबी करुणाकरण यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.


हवाई दलाचं विमान 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतात परतलं


भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने मृतदेहांना कुवेतहून भारतात आणलं गेलं. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचं आगमन झालं. मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3 जणांचा समावेश आहे. या 30 जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले.  उर्वरित मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या C-130J  या विशेष विमानाने आणलं गेलं.


मुंबईच्या मालाडमधील व्यक्तीनेही गमावला जीव


बुधवारी पहाटे साडेचार वाजता ही आग लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली. भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काहीजण आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवेतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे. मुंबईच्या  मालाड (पश्चिम), मालवणी येथील 33 वर्षीय डेनी बेबी जे मागील चार वर्षांपासून कुवेतमधील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते, ते मृत्युमुखी पडले.


मृत्यूमुखी पावलेले 45 लोक कुठले?


मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3, उत्तर प्रदेशातील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा यासारख्या उर्वरित सात राज्यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण 45 जणांचा समावेश आहे.


मालाडमधील व्यक्तीचा मृतदेह मुंबईत पोहोचला


भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेती अधिकारी सतत संपर्कात असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हून अधिक भारतीयांवर उपचार सुरु आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहेत. मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृतदेह दिल्ली येथून रात्री 11.40 वाजता 6ई 519 या विमानाद्वारे मुंबईत पाठवण्यात आला आहे. सदर विमान शनिवारी पहाटे 1.40 वाजता मुंबईत पोहोचलं. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी कुवेत येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक समन्वय साधत या मोहिमेत मत्त्वाची भूमिका बजावली आहे.


महाराष्ट्रातील श्री डेनी बेबी करूणाकरण यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप पोहचवण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राजशिष्टाचार अधिकारी किशोर कनौजिया यांनी याबाबत आवश्यक संवाद साधला.


पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यांनी एक्सच्या माध्यमातून हा दुर्दैवी प्रसंग अत्यंत वेदनादायक असल्याचा शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.


हेही वाचा:


Sheena Bora: शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट, शीनाच्या सांगाड्याचे अवशेष गायब; सीबीआयची कोर्टात धक्कादायक कबुली