मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेचा विषय ठरत असलेल्या कुर्ला बस अपघाताविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. काही जखमींना अपंगत्व आले आहे. अशातच कुर्ला बस अपघातावेळचा (Kurla Bus Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) हा अपघातानंतर बसमधून कशाप्रकारे बाहेर पडला, हे दिसत आहे.
कुर्ल्यातील एलबीएस रोडवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. इलेक्ट्रिक बस सात ते आठ वाहने आणि लोकांना चिरडत गेली. यावेळी बस प्रचंड वेगात होती आणि त्यामध्ये अनेक प्रवासी होती. इलेक्ट्रिक बसने वाहनांना धडका द्यायला सुरुवात केल्यानंतर बसच्या आतील प्रवाशीही प्रचंड घाबरले होते. बस भरधाव वेगाने वाहनांना धडका देत असताना आतील प्रवासी जीव मुठीत धरुन बसले होते. काही प्रवासी सीटला घट्ट धरुन शेवटपर्यंत बसून राहिले. तर उभ्या असलेल्या प्रवाशांनी हँडल्स आणि जो आधार मिळेल त्याला पकडले होते. प्रत्येक वाहनाला धडक दिल्यानंतर बसच्या आतमध्ये मोठे धक्के बसत होते. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरची प्रचंड भीती सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.
सगळे प्रवाशी बाहेर गेल्यानंतर बेस्टचालक संजय मोरे फुटलेल्या काचेतून बाहेर पडला
अनेक वाहनांना आणि लोकांना उडवत जाणारी ही इलेक्ट्रिक बस अखेर एका सोसायटीच्या इमारतीला येऊन धडकली आणि थांबली. त्यानंतर प्रवासी पटापट मिळेल त्या मार्गाने बाहेर पडले. बसचा कंडक्टर सिद्धार्थ मोरे हा मागच्या दाराने बाहेर पडला. तर संजय मोरे याने अपघाताच्या धक्क्यातून सावरत आपल्या दोन बॅग उचलल्या आणि बसच्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर उडी टाकली. संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे बसच्या बाहेर पडल्यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली. मात्र, पोलिसांनी आणि एका नागरिकाने या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या अपघातासाठी नेमके कोण कारणीभूत आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बेस्ट प्रशासन आणि आरटीओकडून इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तर संजय मोरेने आपल्याला ही बस चालवण्यासाठी केवळ एक दिवस प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. मी गेल्या 30 वर्षांपासून वाहन चालवत आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. काहीतरी झाले आणि बसवरील माझे नियंत्रण सुटले, असा दावा संजय मोरेकडून सातत्याने केला जात आहे.
आणखी वाचा