कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय घरत यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी 35 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 27 गावांमध्ये बेसुमार अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत. त्यावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 42 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 35 लाख रुपये देण्याचं ठरलं.
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातल्या घरत यांच्या दालनात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घरत यांनी स्वीकारला. यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ अटक केली.
घरत यांच्यासह केडीएमसीचे लिपिक ललित आमरे आणि लिपिक भूषण पाटील यांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या. यानंतर एसीबीने घरत यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्या गाड्या, घरं यांची तपासणी सुरु झाली आहे. तर त्यांच्या दालनात या लाचेच्या रकमेसह आणखी काही रक्कमही सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली दिली आहे.
घरत यांच्यावरील या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. घरत यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या निलंबनाचा ठरावही महासभेनं केला होता.
आता घरत यांना एसीबीने पकडल्यानंतर कल्याणमध्ये नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तसंच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.